कॉलेजियन्स आणि पालकत्व
आजकाल एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होताना दिसते. त्यामुळे विभक्त कुटुंबातच मुले वाढताना दिसतात. अशा कुटुंब पद्धतीचे काही फायदे सुरवातीला वाटले तरी व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने तोटाच जास्त होतो, असे माझे स्पष्ट मत आहे. घरातील आजी-आजोबांजवळ राहणारी मुले पाळणाघरात वाढणारी मुले यांमधील आत्मविश्वास, व्यक्तिमत्व, भावनिक परिपक्वता या स्तरांवर प्रचंड फरक जाणवतो. माझा पाळणाघराविषयी अजिबात राग नाही पण सोय यापेक्षा नंतर ती एक सवयच पालकांना होऊन बसते. त्यामुळे पालक व मुलांमध्ये नाते निर्माणच होत नाही. उलट मुले पाळणाघरातील काकुंशी attach होतात तेही पालकांना चालत नाही. इथपासूनच मुले व पालक नात्यामध्ये दुरावा येऊ लागतो,याचा परिणाम मुले पौगंडावास्थेमध्ये गेली की अचानक पालकांना जाणवतो. बऱ्याचदा वेळ निघुन गेलेली असते. त्यामुळे या प्रश्नांवर मार्ग काढायचा असेल, तर पालक व मुले यांमध्ये उत्तम नाते निर्माण होण्याची गरज आहे. व ते टिकवण्याची जबाबदारी पुढे पालक व मुले दोघांवरही आहे.
पालक व कॉलेजियन्स मुलांमधील नाते सक्षम होण्यासाठी उपयुक्त टिप्स:
एकमेकांसाठी जाणीवपूर्वक वेळ काढा:
तुम्ही कितीही Busy असाल तरी पालकांनी व मुलांनी रोज स्वतःसाठी व या नात्याचा विकास होण्यासाठी एकमेकांसाठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. रोज एक वेळेचे जेवण तरी कुटुंबाने एकत्र घेतल्यास उत्तम प्रकारे संवाद व विचारांची देवाणघेवाण होऊ शकते.ज्यामुळे रोजच्या दिवसात काय घडले हेही तुम्हाला समजू शकेल. त्यामुळे रोज एकमेकांसाठी वेळ काढण्याचे मनापासून ठरवा.